जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान





भगतसिंग :-

बालपण आजोबांच्या आर्यसमाजी संस्कारात घालवलेले व शालेय जीवनात रोज नित्य नेमाने सकाळ व सायंकाळ प्रार्थना करणारे व गायत्री मंत्रांचा जप करणारे भगतसिंग पुढे क्रांतिपर्वात पूर्णपणे निरीश्वरवादी झाले. यामुळे त्यांना 'आत्मप्रौढी व घमेंड यांची बाधा झाली आहे असेही उठवले गेले. मात्र ऑक्टोबर १९३० मध्ये त्यांनी लिहिलेले "मी निरीश्वरवादी का?" हे प्रकटन वाचल्यावर त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते. समाज हा प्रगत असावा; प्रत्येक घटना, समज वा परंपरा या विचाराच्या ऐरणीवर घासून त्या पटल्या तरच स्वीकाराव्या, उगाच अंधश्रद्धेपोटी वा कुणाच्या व्यक्तिपूजेखातर कसोटीवर न उतरवता कोणतीही गोष्ट स्वीकारू नये, समाज हा समभावी व शोषणमुक्त असावा, समाजरचनेत व देशाच्या रचनेत धर्म, जात हे आड येऊ नयेत, उगाच कुणाचे स्तोम माजवून जनतेने आपल्या बुद्धीचा कस न लावता दबावामुळे पटत नसले तरी कुणीतरी मोठे सांगत आहे म्हणून जे वास्तविक नाही वा ज्याला तात्त्विक पाया नाही असे काही स्वीकारू नये, समजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग - नरक, जन्म -पुनर्जन्म,८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. कामगार हा राज्याचा मुख्य घटक असावा, त्याचे भांड्वलदारांकडून शोषण होऊ नये व राज्यकारभारात त्याला स्थान असावे असे भगतसिंगांचे आग्रही प्रतिपादन होते. अत्यंत प्रतिकूल व कष्टसाध्य असे जीवन समोर असताना ज्याचा मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीवर वा या जन्मात सत्कार्य केले असता मोक्ष मिळतो वा या जन्मात केलेल्या कृत्याचे फळ म्हणून पुढील जन्म अत्यंत सुखाचा जातो या गोष्टींवर विश्वास आहे त्याला समोर असलेला मृत्यू पुढील प्राप्तीच्या ओढीने सुसह्य वाटू शकतो. मात्र ज्याचा या गोष्टींवर जराही विश्वास नाही परंतु जो मातृभूमीला परदास्यातून मुक्त करणे व समाजाला शोषणातून मुक्त करून मानाचे जीवन प्राप्त करून देणे हेच आपल्या आयुष्याचे प्रथम व अखेरचे ध्येय समजतो त्याचे जीवन हे अधिक खडतर परंतु अर्थपूर्ण असते असा त्यांचा सिंद्धांत होता. जगात जर सर्वात भयानक पाप असेल तर ते गरिबी व सर्वात मोठा शाप कोणता असेल तर तो दास्य हाच आहे. आणि या दास्याला ईश्वरी कोप मानून त्या दास्यातून मुक्त होण्यासाठी बलिदानाला सज्ज होण्याऐवजी ईश्वराची करुणा भाकणे हे मूर्खपणा व पळपुटेपणाचे लक्षण आहे तसेच मुक्तीसाठी ठोस प्रयत्न न करता केवळ प्राक्तनाला दोष देणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असे त्यांनी प्रतिपादीले. सुमारे दहा पाने भरेल इतके मोठे हे प्रकटन अत्यंत प्रभावी व भारून टाकणारे आहे. हुतात्मा भगतसिंग यांच्या चरित्राचा अभ्यास केला असता आपल्याला समजते की त्यांनी केलेले बलिदान हे भावनेच्या आहारी जाऊन वा कसल्यातरी प्राप्तीसाठी केले नसून ते अत्यंत सुनियोजित, अत्यंत ध्येयबद्ध व प्रेरणादायक होते. आपण राहणार नाही, पण आपण लावलेल्या क्रांतिवृक्षाच्या सर्व फांद्या भले शत्रूने छाटून टाकल्या तरी पाळेमुळे घट्ट रुजून राहतील व हीच मुळे एक दिवस बंदिवासाच्या भिंती उन्मळून टाकतील हा त्यांचा दृढ विश्वास होता.

एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त अशी अनेक रुपे या महायोग्याचे जीवनचरित्र वाचताना दिसून येतात. अत्यंत ज्वालाग्रही पण अत्यंत शांत. अत्यंत निग्रही पण तितकेच हळवे. अत्यंत तडफदार पण उतावळे नाहीत. अत्यंत कणखर पण तरीही विनम्र. स्वातंत्र्य देवतेला सर्वस्वाचा नैवेद्य दाखवूनही निरीश्वरवादी राहिलेले. पुनर्जन्मावर विश्वास नसलेले पण तरीही पुन्हा याच देशात जन्माला येण्यास उत्सुक असलेले.जगात सर्वात घोर पाप असेल तर ते म्हणजे गुलामी व दारिद्र्य असे ठामपणे सांगत देवाला साकडे घालण्यापेक्षा स्वतः:ला सक्षम करण्याचा व त्यागावाचून आणि साहसावाचून उद्धार नसल्याचा संदेश देणारे. आपल्याच आदरस्थानी मानलेल्या नेत्यांनी निर्भत्सना केल्यावरही विचलित वा क्षुब्ध न होता वा त्यांना कसलेही दूषण न देता आपले कार्य तितक्याच निष्ठेने सुरू ठेवणारे हे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.

भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते.सचिंद्रनाथ संन्याल यांचे 'बंदी जीवन' हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक.ऑस्कर वाइल्ड्चे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांचे चरित्र, वॉल्टेर, रुसो,व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते.त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नामावली फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. स्वा. सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हा सरकारने प्रकाशना आधीच बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधार्थ होता. युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून घेऊन त्यांनी त्याचे इथे प्रकाशन व वितरण केले. जर क्रांती व्ह्यायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडविली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांतिवाङ्मयाचा प्रसार अपरिहार्य़ आहे असे त्यांचे मत होते. त्यांनी स्वा. सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते. त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक व्हिलांत वाचला होता. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनीन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते.

भगतसिंग हे एक पत्रकार होते व लेखकही होते तसेच उत्तम वक्ते होते. १९२४-२५ च्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या कॊंग्रेस अधिवेशनास ते 'अकाली' या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर ते त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले. तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप',इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. सोहनसिंग जोशी यांचे 'कीर्ती', कानपूरचे 'प्रभा', दिल्लीचे 'महारथी' नि अलाहाबादचे 'चॊंद' या नियतकालिकात ते लेखन करत असत. त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन ब्रिन याच्या पुस्तकाचा अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम' बलवंतसिंग या नावाने केला. लालाजींच्या मृत्यू नंतर त्यांनी 'चॊंद' च्या फाशी विशेषांकात 'निर्भय', 'बलवंत', व 'ब्रिजेश' या नावे अनेक लेख लिहिले. महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधात 'नॅशनल कॉलेज' तर्फे पाठविण्यात आलेला भगतसिंगांचा निबंध अव्वल ठरला होता. भगतसिंगांनी 'राणा प्रताप','दुर्दशा','सम्राट चंद्रगुप्त' या नाटकांतून भूमिकाही केल्या होत्या; पुढे सरकारने या नाटकांवर बंदी घातली होती.

९ सप्टेंबर १९२५ रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाजप्रबोधन, माहितीपत्रके, साहित्य सामुग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर 'आर्मी' हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे 'मुख्य सेनापती' तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहोंचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपविली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलथून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना.

सुखदेव थापर :-


राजगुरु :-

राजगुरुचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे झाला. नंतर त्याचे राजगुरु असे नामकरण करण्यात आले. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.लहानपणी १४ व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहीत वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरासाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता .त्या काळी कोलकाता, पटना, कानपूर, लखनऊ, झाशी, मेरठ, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच सार्‍यांचे आश्रयस्थान होते, गुप्तकेंद्र होते.मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले.

दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. ‘आपणासारिखे करिती तात्काळ असे आझाद, अन्‌ दुजांसारखे होती तात्काळ असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६ चा आकडा हेच या गुणांचे तात्पर्य होते आणि या ध्येयासाठी, हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. जणू हौतात्म्याची त्यांना घाईच झाली होती. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणेच विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार; आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की, आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.

आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण ‘अॅक्शन’ ची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असं सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसर्‍या पिस्तुलाची सोय करण्यासाठी शर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइटस्‌, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली...

इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरूळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरूळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसर्‍या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला! राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती सॉंडर्स वधाच्या वेळी!

त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने सॉंडर्स याच्यासमवेत लालाजींवर तीव्र लाठीमार केला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणं आवश्यक होतं, की स्कॉटला का मारावं लागलं? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले.

योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंह व राजगुरू त्याच्या इशार्‍यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकार्‍याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वत:चा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले. मेला तो स्कॉट नसून सॉंडर्स होता हे कळल्यावर त्या दोहोंना अर्थातच! विशेष दु:ख झाले नाही.

सॉंडर्स हत्याकांडानंतर लाहोरहून भगतसिंह एका मिल्ट्री ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.

त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले.

पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंह, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले.

सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकार्‍यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करत. या पोलिसांच्या प्रयत्नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला. शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला

"वर निर्दिष्ट केलेल्या आरोपींनी ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी निरनिराळ्या वेळी अन्य कित्येक सहकाऱ्यांसह १९२४ सालापासून ते अटक होईपर्यंत राजाविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचा, त्याचे हिंदुस्थानावरील सार्वभौमत्व हिरावून घेण्याचा आणि अवैध बळाचा वापर करून किंवा धाक दाखवून हिंदुस्थानात विधिवत स्थापित झालेले सरकार उलथून टाकण्याचा कट केला आणि त्या उद्दिष्टासाठी माणसे, शस्त्रे आणि दारुगोळा जमा केला व अन्य मार्गाने सिद्धता केली.

हे उद्दिष्ट गुप्त ठेवले तर युद्ध करणे सोपे जाईल म्हणून हि उद्दिष्टे त्यांनी गुप्त ठेवली. त्यांनी व इतर आरोपींनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी' या संस्थांची स्थापना केली. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार उलथून टाकून त्या ठिकाणी एका संयुक्त प्रजासत्ताक सरकाराची स्थापना करण्याच्या उद्देशाने ब्रिटिश हिंदुस्थानात लाहोर आणि इतर ठिकाणी बैठकी घेतल्या. आरोपींनी आपली उद्दिष्टे पुढील मार्गांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला:-

१) बॆंका फोडण्यासाठी व आगगाड्या लुटण्यासाठी शस्त्रे, माणसे नि पैसा तसेच दारुगोळा जमवणे.

२) हत्या करण्यासाठी व सरकार उलथून पाडण्यासाठी शस्त्रे व बॊंब व स्फोटके यांची निर्मिती करणे.

३) ब्रिटिश हिंदुस्थानात सरकारचे सहाय्यक वा पक्षपाती असणाऱ्या पोलिस वा इतर आधिकाऱ्यांचे आणि लोकांचे, कटाच्या उद्दिष्टात खंड पाडणाऱ्या तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वाटणाऱ्या लोकांचे वध करणे.

४) आगगाड्या उडविणे

५) क्रांतिकारक आणि राजद्रोही वांङ्मयाची निर्मिती, प्रसार व संग्रह करणे

६) वैध बंदिवासातून दंडितांची व इतरांची सुटका करणे

७) कटात सहभागी होण्यासाठी सुशिक्षित तरुणांना चिथावणी देणे व

८) हिंदुस्थानात क्रांती घडवून आणण्यात स्वारस्य असणाऱ्या परदेशातील व्यक्तीकडून वर्गणीच्या रूपात पैसा गोळा करणे."

सदर आरोपपत्र वाचताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल, की स्वातंत्र्ययुद्धाचा असे महान उद्वाते आमच्या या देशात होऊन गेले .

शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंह व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंह व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण ठरला.



अशा माझ्या मातृभूमीच्या शूरवीरांना माझे कोटी कोटी सलाम! जय हिंद!!!

Read Next Post :-
मी नास्तिक का झालो - शहीद भगतसिंग (वय 23 वर्षे)

With Ref :- Wikipedia